हिंगोली – महाराष्ट्रात ठिकठिकाणी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा पार पडल्यानंतर आता आज (रविवार दि. 26 नोव्हेंबर) हिंगोलीमध्ये ओबीसींचा महामेळावा पार पडणार आहे. हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर या ओबीसींच्या महामेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
अशात मिळलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंगोलीकडे जाताना छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्यात आला असून ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या मेळाव्यासाठी चार लाखांपेक्षा अधिक ओबीसी बांधव एकवटणार असल्याने, आयोजकांकडून पार्किंग, नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी लाखो ओबीसी बांधव येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (ता. 23) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. सचिन नाईक, अॅड. रवी शिंदे, सुरेशआप्पा सराफ, डॉ. नागोराव जांबुतकर, उमेश गोरे उपस्थित होते.
यावेळी अॅड. रवी शिंदे यांनी सांगितले की, हिंगोली येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळाव्याचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे राहणार आहेत.
मार्गदर्शक म्हणून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री संजय राठोड, भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजीमंत्री महादेव जानकर, माजीमंत्री विनय कोरे, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, माजीमंत्री विजयराव चौगुले, शब्बीर अहमद अन्सारी, कल्याण दळे, लक्ष्मण गायकवाड, माजी खासदार विकास महात्मे, पल्लवी रेणके, महंत सुनील महाराज, हरिदास भदे, प्रा. श्रावण देवरे, प्रा. लक्ष्मण हाके, प्रा. टी. पी. मुंडे, आमदार संतोष बांगर, आमदार प्रज्ञा सातव, आमदार इंद्रनील नाईक, निलय नाईक, प्रदीप नाईक आदींची उपस्थिती राहणार आहे.
प्रमुख अतिथी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बी. डी. चव्हाण, डॉ. नागोराव जांबूतकर, हकीम बागवान, चंद्रकांत लव्हाळे, बी. डी. बांगर, विठ्ठल गाभणे, पंकज होडबे, केशव मस्के, साहेबराव मस्के, अशोक ठेंगल आदींनी केले आहे.