सातारा – भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी अत्यंत मुत्सद्दीपणाने मोर्चेबांधणी केली आहे . सलग दोन दिवस मुंबईत तळ देऊन आधी उपमुख्यमंत्री अजित पवार व शुक्रवारी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन शिवेंद्रसिंहराजे यांनी सूचक पावले टाकली आहेत .
दोन्ही पवारांशी झालेल्या भेटीत शिवेंद्रसिंहराजे यांनी थेट जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान होण्याची इच्छा थेटपणे व्यक्त केल्याने राष्ट्रवादीच्या वर्तुळात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे . यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीमध्ये राजेगटाच्या झालेल्या बिनविरोध निवडी चर्चेच्या विषय ठरल्या.
भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी निर्णायक क्षणापर्यंत उदयनराजे विरोध कायम ठेऊन राष्ट्रवादीशी चांगलेच राजकीय सूत जमविले . साडेसहा वर्षाच्या अध्यक्षपदाच्या वाटचालीत बँकेची आर्थिक सक्षमता संतुलित ठेवत पक्षविरहित राजकारणाचा अजेंडा शिवेंद्रसिंहराजे यांनी राबविला.
केवळ तेच नाही तर राष्ट्रवादीचे थिंक टँक विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी उत्तम समन्वय ठेऊन शिवेंद्रसिंह यांनी स्वतःची जागा बिनविरोध तर केलीच शिवाय स्वतःच्या विचाराचे सहा संचालक त्यांनी निवडून आणले . राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलचे आमदार शशिकांत शिंदे यांना ज्ञानदेव रांजणे यांच्या माध्यमातून पराभवाचा धक्का देतानाही शिवेंद्रसिंहराजे यांनी तो मी नव्हेच म्हणत आपल्या चतुरस्त्र राजकारणाची झलक दाखविली .
यापुढील राजकीय नाट्याची झलक शिवेंद्रसिंहराजे यांनी गेल्या दोन दिवसात मुंबईतून दाखविली . बाबा राजे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन अध्यक्षपदासाठी पुन्हा संधी देण्याची केवळ गळच घातली नाही तर मी रामराजे यांच्याशी नक्कीच चर्चा करेल असा खात्रीचा शब्द सुध्दा घेतला . याच दरम्यान विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील , यांनी शरद पवार यांची भेट घेत जिल्हा बँकेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा असावा असा आग्रह धरल्याचे वृत्त आहे . जिल्हा बँकेच्या निमित्ताने झालेल्या राजकीय खेळ्यांची साद्यंत माहिती मकरंद पाटील यांनी शरद पवारांना दिली .
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी शुक्रवारी मुंबईतच तळ देऊन शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली . आपण स्व . अभयसिंह महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण करत आहात, अध्यक्ष या नात्याने बँकेची जवाबदारी सुध्दा आपण सक्षमपणे सांभाळली या शब्दात शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कौतुक केले जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा संधी देण्यात यावी अशी गळ त्यांनी शरद पवारांना घातली .
या विनंतीला शरद पवार मान देणार का ? हा औत्सुक्याचा विषय आहे . या विषयावर तुम्ही अजीत पवार व रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा केली का ? या प्रश्नांवर शिवेंद्र राजे यांनी होकार दिला . उभयतांशी मी चर्चा करतो असे आश्वासन पवार यांनी दिले .
शिवेंद्रसिंह राजे यांनी पवार भेटीचा मास्टर स्ट्रोक मारल्याने त्याची दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची शक्यता बळावली आहे . राष्ट्रवादीतून नितीन पाटील व राजेंद्र राजपुरे , सत्यजितसिंह पाटणकर यांची नावे चर्चेत आहे . येत्या ६ तारखेच्या विशेष सभेत अध्यक्षपदाची निवड करावयाची आहे .
त्यामुळे शनिवारी राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत होणार असण्याची शक्यता असून या बैठकीत जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचे नाव शरद पवारांशी बोलून निश्चित केले जाणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली .