एकनाथ खडसे समर्थक सारिका पवार यांचा राजीनामा
आकुर्डी – एकनाथ खडसे समर्थक व पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) ओबीसी महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सारिका पवार यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व ओबीसी महिला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्याकडे पक्ष कार्यालयात सुपूर्द केला.
एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षाला मोठी हानी होईल, असे अंदाज काहींनी बांधले होते. शहरात या गळतीला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची सत्ता नसताना पक्ष संघटनेत तसेच भाजपा सदस्य नोंदणी, विविध आंदोलने करत पक्षवाढीत योगदान दिले होते. पक्ष संघटना वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. परंतु 2017 मध्ये पक्षश्रेष्ठींनी सारिका पवार यांची उमेदवारी डावलली होती.
पूर्णानगर येथील रहिवासी असणाऱ्या पवार यांनी 2017 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी प्रशासनाला अनेक निवेदने देऊन प्रभागातील प्रश्न सोडविले होते. केवळ खडसे समर्थक असल्यामुळे माझी उमेदवारी नाकारली होती, असा आरोपही पवार यांनी पक्ष सोडताना केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाची सत्ता आल्यानंतर पक्षाने माझ्या कार्याची दखल घेतली नाही. तसेच एकनाथ खडसे हे माझे जवळचे नातेवाइक असल्याने त्यांच्या सन्मानार्थ मी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा दिला आहे.
– सारिका पवार, अध्यक्षा, एकता महिला प्रतिष्ठान, पूर्णानगर