नवी दिल्ली – राजस्थानमध्ये एका गर्भवती महिलेला विवस्त्र करून रस्त्यावर फिरल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीला विवस्त्र करून गावातील रस्त्यावरून फिरवल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. त्यावेळी ही महिला मदतीसाठी आर्त हाक देत होती. मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी समोर आले नाही. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 6 आरोपींना अटक करण्यासाठी 6 पथके तयार केली आहेत.
या संपूर्ण घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही चिंता व्यक्त केली आहे. जेपी नड्डा यांनी ट्विट केले की, “राजस्थानच्या प्रतापगडचा व्हिडिओ धक्कादायक आहे”. गेहलोत सरकारवर हल्लाबोल करत त्यांनी पुढे लिहिले की, “मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे मंत्री परस्पर वाद सोडवण्यात व्यस्त आहे आणि उरलेला वेळ दिल्लीतील घराणेशाहीला खूश करण्यात घालवत आहे. राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नांकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. ते म्हणाले की, राजस्थानची जनता राज्य सरकारला धडा शिकवेल. ‘
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांनीही या घटनेवर शोक व्यक्त करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राजस्थानमधील शासन व्यवस्था कोलमडली आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये महिलेला मारहाण आणि विवस्त्र होताना दिसत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित महिलेचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते, मात्र ती पतीला सोडून माहेरी परतली होती. नाता प्रणाली अंतर्गत ती दुसऱ्या व्यक्तीसोबत गेली होती. हा प्रकार तिच्या पतीला समजताच तो कुटुंबीयांसह महिलेच्या घरी पोहोचला आणि तिला मारहाण करू लागला.
नाता प्रथेनुसार विवाहित महिला आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहू शकते. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विधींची गरज नाही किंवा स्त्री किंवा पुरुषाने लग्न करण्याची गरज नाही.
पोलीस काय म्हणतात?
या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला आदिवासी समाजातील आहे. या प्रकरणी महिलेचा माजी पती, सासरा आणि इतर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी एकूण सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याचवेळी या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही पोलीस महासंचालकांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.