बंगळूर – कर्नाटकमधील सत्तारूढ भाजपचे ज्येष्ठ नेते बसनगौडा पाटील-यत्नाल यांनी पुन्हा एकदा राज्यात नेतृत्वबदल होण्याचे भाकीत केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे स्थान डळमळीत असल्याच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळण्याची शक्यता आहे.
वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या लोकप्रतिनिधींवर केंद्रात किंवा राज्यात कुठली जबाबदारी न सोपवण्याचे अलिखित धोरण भाजपने स्वीकारल्याचे मानले जाते. त्यातून येडियुरप्पा यांच्या वयाचा (77 वर्षे) विचार करून त्यांच्या जागी नव्या मुख्यमंत्र्याची निवड केली जाईल, अशी कुजबूज कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू आहे. तशात येडियुरप्पा यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जाणारे यत्नाल यांच्या भाकितांमुळे नेतृत्वबदलाच्या चर्चा थंडावताना दिसत नाहीत.
कर्नाटकमध्ये संक्रांतीनंतर ऐतिहासिक बदल होतील, असे काही दिवसांपूर्वी त्यांनी म्हटले होते. आता त्यांनी एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात कर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळेल, असे नवे भाकीत केले. मंत्रिपद न मिळाल्याच्या नाराजीपोटी यत्नाल सातत्याने येडियुरप्पा यांच्या विरोधात मोहीम राबवत असल्याचा एक मतप्रवाहही आहे.
मात्र, त्याचवेळी पक्षशिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून यत्नाल यांना आवर का घातला जात नाही, याबाबत आश्चर्यही व्यक्त होताना दिसते. त्यातून पक्षाचे केंद्रीय नेतृत्व येडियुरप्पा यांना बदलण्याचा विचार करत असल्याच्या अटकळींना आणखीच जोर येत आहे.