वाघोली (प्रतिनिधी) : राज्यातील विविध विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाभिमुख शिक्षण घेताना विविध महाविद्यालयातून शैक्षणिक फी वसुलीचा तगादा मोठ्या प्रमाणावर लादला जात असून ही विद्यार्थ्यांची लूट थांबवण्यासाठी कार्य करणार असल्याचे भाजप नेते गणेश कुटे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विद्यापीठांच्या अंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयाकडून शैक्षणिक साठी गेल्या दोन वर्षात पालकांची व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक करण्यात आली असून ही थांबवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा व वेळप्रसंगी आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवून न्याय मिळवून देणार असल्याचे भाजप नेते गणेश कुटे यांनी सांगितले.
या बाबत कुटे यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षाहून अधिक काळात कोविड-19 मुळे नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले आहे. या व इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरताना पालकांना मोठ्या अडचणी आल्या आहेत. तरीही काही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी वसूल करून परीक्षेसाठी त्यांना प्रविष्ट होताना मोठा त्रास दिला असल्याची तक्रारी येत आहेत त्या अनुषंगाने भाजप युवा मोर्चाच्या वतीने अशा महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांची यादी तयार करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याच्या हेतूने कार्य करणाऱ्या संस्थाचालकांच्या शैक्षणिक संस्थेच्या मान्यता रद्द करण्यात याव्यात यासाठी विद्यापीठ प्रशासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे कुटे यांनी सांगितले.