सत्ता जात असल्याने भाजपा वैफल्यग्रस्त ; हाणामारीत महाजनांनाही प्रसाद- जयंत पाटील

मुंबई: जळगावमधील भाजपा कार्यकर्त्यांच्या हाणामारीत गिरीश महाजनांनाही प्रसाद मिळाला. भाजपामधील अंतर्गत असंतोष टोकाला पोहोचला असून सत्ता जात असल्याने भाजपा वैफल्यग्रस्त झाला आहे. पक्षासाठी आयुष्य दिलेल्या व्यक्तींना डावलले जात असल्याने त्या पक्षाचा खरा कार्यकर्त्याही भाजपाला नाकारत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जळगावमधील अमळनेरमध्ये भाजपच्या मेळाव्यात जोरदार राडा झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि समर्थकांनी पक्षाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केली. यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील इत्यादी नेते उपस्थित होते. त्यांच्याच उपस्थितीत हा राडा झाल्यामुळे भाजपमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे.

अमळनेरमध्ये काल संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरुवातीला उदय वाघ आणि बी एस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मग या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. मंचावरच दोन्ही नेते भिडले. चपला बुटांनी एकमेकांना मारले. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बी एस पाटील यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. उदय वाघ यांच्या समर्थकांनी यावेळी स्मिता वाघ आगे बढो, अशी घोषणाबाजीही केली.

उदय वाघ हे स्मिता पाटील यांचे पती आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघात स्मिता पाटील यांची उमेदवारी रद्द करुन उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द होण्यामागे बी एस पाटील यांचा हात असल्याचा संशय उदय वाघ यांच्या मनात होता. त्याच रागातून ही हाणामारी झाल्याची चर्चा आहे.

आज स्मिता वाघ आणि उदय वाघ यांच्या गावात भाजपचा मेळावा आयोजित केला होता. त्याचीच संधी साधून उदय वाघ आणि समर्थकांनी बी एस पाटील यांना मारहाण केली. यावेळी स्वत: गिरीश महाजन यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.