कांगडा – भाजपने आम आदमी पक्षाचा (आप) धसका घेतला आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशसारख्या राज्यात भाजप सरकार मोफत वीज पुरवण्यासारख्या घोषणा करत आहे, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी केला.भाजपची सत्ता असणाऱ्या गुजरात आणि हिमाचल या राज्यांत चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.
त्या निवडणुकांना ताकदीने सामोरे जाण्यासाठी आप सज्ज झाला आहे. त्याचाच भाग म्हणून केजरीवाल यांनी हिमाचलमध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी प्रामुख्याने भाजपवर शाब्दिक हल्लाबोल केला. सत्तेवर आल्यानंतर दिल्लीत आप सरकारने सरकारी शाळा आणि रूग्णालयांच्या स्थितीत प्रचंड सुधारणा केली.
तशी स्थिती आणि प्रामाणिक सरकार मिळण्याची इच्छा असल्यास हिमाचलमधील जनतेने आपच्या पाठिशी उभे राहावे. हिमाचलवर अनेक वर्षे कॉंग्रेस आणि भाजपने राज्य केले. आता आपला पाच वर्षांसाठी केवळ एक संधी द्या. आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आपला मत देऊ नका, असे आवाहन त्यांनी हिमाचलमधील जनतेला केले. अवघ्या महिनाभराच्या कालावधीत केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा हिमाचलचा दौरा केला.