नवी दिल्ली – तामिळनाडूच्या तमिळ मनिला काॅंग्रेस अर्थात टीएमसीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये सामील होण्याची घोषणा केली असून भाजपसोबत आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूमध्ये भाजपची ही पहिली अधिकृत युती आहे. जीके वासन यांच्या नेतृत्वाखालील तमिळ मनिला काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी तामिळनाडूमध्ये भाजपसोबत युती करण्याची घोषणा केली.
यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूमध्ये भाजपला दक्षिणेत नवा मित्रपक्ष मिळाला आहे. २७ फेब्रुवारी रोजी पलाडम येथे पंतप्रधान मोदींच्या सभेलाही आपण उपस्थित राहणार असल्याचे पक्षाध्यक्ष वासन यांनी सांगितले.
तमिळ मनिला काँग्रेसने २०२१ ची विधानसभा निवडणूक अखिल भारतीयय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) आणि भाजपसोबत युती करून लढवली होती. आता तमिळ मनिलाने एआयएडीएमके सोबतची युती तोडण्याचे संकेत दिले आहेत. एआयएडीएमकेने सप्टेंबर २०२३ मध्ये रालोआसोबतचे संबंध तोडले होते.
मात्र, आगामी काळात युती आकारास येणार असून जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे वासन यांनी स्पष्ट केले. आज आपल्याला वाटतं की देशाचा आर्थिक विकास आणि सुरक्षा ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत तमिळ मनिला काँग्रेसने भाजप आणि त्यांच्या केंद्रीय आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
जीके वासन यांच्या घोषणेनंतर तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी चेन्नईत टीएमसी प्रमुखांची भेट घेतली. बैठकीनंतर अण्णामलाई म्हणाले की, भाजप अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे, असे भाजपच्या विरोधात तयार केलेले कथन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोडून काढले जाईल. यावेळी भाजप तामिळनाडूमध्ये आपली पूर्ण ताकद वापरत आहे. भाजप एआयएडीएमके सोबत युती करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत होता, पण एआयएडीएमके युतीतून बाहेर पडल्यानंतर, भाजप छोट्या पक्षांसोबत राज्यात आपला पाठिंबा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.