लखनौ – महिला अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाने बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशात भाजपकडून बलात्काराची शिक्षा भोगत असलेल्या माजी आमदाराच्या पत्नीला निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सिंह सेंगर याची पत्नी संगीता सेंगर यांना भाजपने जिल्हा परिषदेच्या निवडणुकींच तिकीट दिलं आहे. २०१६ मध्ये संगीता अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष करण्यात आलं होतं.
संगीता सेंगर यांना भाजपने फतेहपूर चौरासी तृतीय गटासाठी तिकीट दिलं आहे. खुद्द कुलदीप सिंह सेंगर बांगरमाऊ मतदार संघातून चार वेळा भाजपच्या तिकीटावर निवडून आला आहे. 2017 मध्ये उन्नाव बलात्कार प्रकरणी सेंगर यांला अटक करण्यात आली होती. त्यानंतर भाजपने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्याचं विधानसभा सदस्यत्व देखील संपुष्टात आलं. आता भाजपकडून सेंगरच्या पत्नीला बळ देण्यात येत आहे.