गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव-नागझीरा व्याघ्र प्रकल्पातील जंगलाला लागलेली आग विझवताना तीन मजूर मरण पावल्याची घटना घडली आहे. त्या जंगलाचे वनसंरक्षक अधिकारी एम. रामानुजम यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
त्यांनी म्हटले आहे की काही अज्ञात व्यक्तींमुळे जंगलाला गुरुवारी रात्री ही आग लागली. ही आग विझवण्याचे काम वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी व मजूर मिळून करीत होते. 50 ते 60 लोक या कामी व्यस्त होते. त्यांनी पहाटे पाचच्या सुमाराला ही आग आटोक्यात आणली.
हे काम करीत असताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला. अन्य काही जण जखमी झाले असून त्यांना नागपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृत मजुरांची ओळख पटली आहे.