देहुगाव, (वार्ताहर) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा सदेह वैकुंठगमन त्रिशतकोतर अमृत महोत्सव सोहळा बुधवारी (दि. २७) संपन्न होत आहे. या सोहळ्यानिमित्त श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्याला आज प्रारंभ होत असून फाल्गुन कृ.७ च्या रात्री लळीत झाल्यानंतर मंगळवारी ( दि.२ ) नारळ प्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता होणार आहे. संत तुकाराम महाराज वैकुंठगमन अर्थात बीज सोहळ्याचे यंदाचे ३७६ वे वर्षे आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल होणारे वारकरी, भाविक भक्तांच्या सोयी-सुविधांसाठी विविध सामाजिक संस्था, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, शासकीय यंत्रणा यासह स्थानिक प्रशासन सज्ज आहे.
इंद्रायणी नदी घाटांसह ठिकठिकाणी सुरू असलेल्या अखंड पारायण, सप्ताह, भजन-कीर्तन आणि आगमन होणाऱ्या दिंड्या व भाविकांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण आहे. मुख्यकमान, १४ टाळकरी कमान, मुख्यमंत्री वैकुंठगमन मंदिर, गाथा मंदिरांवरावरील विद्युत रोषणाई, भाविकांसह ग्रामस्थांना आकर्षित करीत आहे. विद्युत रोषणाईने परिसर लखलखाट झाला आहे.
बीज सोहळा धार्मिक कार्यक्रम
पहाटे ३ वाजता मुख्य मंदीदिरात काकडा आरती. पहाटे ४ वाजता ” श्री ” ची पूजा श्री संत तुकाराम शिळा मंदिरात महापूजा. पहाटे ४.३० वाजता श्री विठ्ठल-रखूमाई, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधीची महापूजा, संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज, वारकरी यांच्या हस्ते.
पहाटे ६ वाजता वैकुंठगमन स्थान (गोपाळपुरा) श्री संत तुकाराम महाराज महापूजा, सकाळी १०.३० वाजता पालखी प्रस्थान मुख्य मंदीरातून वैकुंठगमन स्थान संत तुकाराम महाराज मंदिराकडे. सकाळी १० ते १२ वाजता हभप देहूकर महाराज यांचे वैकुंठगमन सोहळा कीर्तन. कीर्तनानंतर आरती होताच नांदुरकीच्या वृक्षावर हरि नाम व तुकाराम महाराजांचे नामस्मरण करीत तुळशीपाने, पुष्पाची उधळण होईल. दुपारी १२.३० वाजता पालखीचे मुख्य मंदिराकडे पुनरागमन. रात्री पारंपरिक फड आणि दिंड्यांचे कीर्तन.
चोख बंदोबस्त
पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनात केलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देहूत प्रवेश करणाऱ्या मार्गावर बँरेकेड्स उभारण्यात आले असून वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली आहे.
१ पोलीस उपायुक्त, ३ सहाय्यक पोलीस आयुक्त, १६ पोलीस निरीक्षक, ४७ पोलीस अधिकारी, ३६३ महिला व पुरुष पोलीस अंमलदार, २ एसआरपी प्लाटून, १ आरसीपी पथक यांसह ५० साध्या गणवेशात गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस, बॉम्बशोधक, श्वान पथक, गजराज बोटींग क्लबचे जीव रक्षक, घाट परीसरात बोटींग क्लबचे सीसी कॅमेरे. तर वाहतूक विभागाचे १ पोलीस उपायुक्त, ३ सहाय्यक पोलीस आयुक्त , ८ पोलीस निरीक्षक, १७ पोलीस अधिकारी, १३२ वाहतूक नियंत्रक पोलिस अमलदार, ३५ वार्डन बॉय असतील.
प्रशासनातर्फे सुविधा
प्रशासनाच्या वतीने सुविधा सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचे चार ठिकाणी बाह्यरुग्ण तपासणी कक्ष, १ कार्डीयक रूग्णवाहिका, ३ रूग्णवाहिका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालयात रुग्णांसाठी खात्यांची व्यवस्था आहे. तसेच २४ तास पाणी पुरवठा, शौचालय, स्वच्छतागृह, अग्निशामक वाहन, १२ पिण्याच्या पाण्याचे टँकर, महावितरणाकडून अखंडित विद्युत पुरवठा नियोजन, येणाऱयांसाठी पीएमपीएल बसेस गावाबाहेर वाहनतळ असणार आहे.