अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड ः नाराजी असूनही शिवसेनेने पाळला “युतीधर्म’
पुणे – महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर पक्षीय बलानुसार सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची निवड झाली आहे. शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी अमोल बालवडकर, विधि समितीच्या अध्यक्षपदी योगेश समेळ, महिला-बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी ज्योत्स्ना एकबोटे आणि क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी विजय शेवाळे निवडून आले आहेत. ही निवडणूक शनिवारी झाली.
या प्रक्रियेत पीठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून “पीएमपीएल’च्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे काम पाहिले. विषय समित्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे वर्चस्व असल्याने त्यांच्याच उमेदवारांचा विजय होणार हे निश्चित होता. मात्र, विषय समित्यांमध्ये डावलल्यानंतर शिवसेना भाजपला साथ देणार का हे पहायचे होते. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला साथ देत युतीचा धर्म पाळला. तर कॉग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले.
शहर सुधारणा समितीअध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अमोल बालवडकर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवराज बेलदरे यांचा 8 विरुद्ध 4 मतांनी पराभव केला. आणि उपाध्यक्षपदासाठी भाजपच्याच धनराज घोगरे यांनी कॉंग्रेसच्या रफिक शेख यांचा 8 विरुद्ध 4 मतांनी पराभव केला. विधि समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या योगेश समेळ यांनी राष्ट्रवादीच्या योगेश ससाणे यांचा 6 विरुद्ध 3 मतांनी पराभव केला, तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्याच वीरसेन जगताप यांनी बाळा धनकवडे 7 विरुद्ध 3 मतांनी पराभव केला.
महिला-बालकल्याण समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या ज्योत्स्ना एकबोटे यांनी राष्ट्रवादीच्या संजीला पठारे यांचा 7 विरुद्ध 3 मतांनी पराभव केला, तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या लता राजगुरू यांनी माघार घेतल्याने भाजपच्या श्रद्धा प्रभुणे यांची बिनविरोध निवड झाली.क्रीडा समितीअध्यक्षपदासाठी भाजपच्या विजय शेवाळे यांनी राष्ट्रवादीच्या लक्ष्मी आंदेकर यांचा 9 विरुद्ध 3 मतांनी पराभव केला. तर उपाध्यक्षपदासाठी घेतलेल्या मतदानामध्ये भाजपच्या महेश वाबळे यांनी राष्ट्रवादीच्याच ऍड. भैय्यासाहेब जाधव यांचा 9 विरुद्ध 3 मतांनी पराभव केला.