विद्युत खांब पडल्याने वीजपुरवठा विस्कळीत

वाई – वाई येथील मोतीबाग पेटकर वस्तीजवळ विजेचे 2 खांब पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. खांब पडून गेले 5-6 दिवस झाले तरी महावितरण कंपनीकडून विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याबाबतची तक्रार त्या परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या वाई विभागीय कार्यालयात दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, रविवार, 26 एप्रिल 2019 रोजी मध्यरात्री मोतीबाग राजापुरे वस्तीजवळ छोट्या वादळामुळे वीज वितरण कंपनीचा सिमेंटचा खांब उन्मळून पडला. त्यासोबतच दुसराही पोल वाकडा झाल्याने विद्युत पुरवठा बंद करावा लागला आहे. वीज पुरवठा नियमित करण्यासाठी दोन्ही खांब बदलावे लागणार आहेत.

खांब पडल्यामुळे महावितरणच्या दगडे डीपी वरून पेटकरवस्ती, शिंदे मळा याकडे जाणारी विद्युत वाहिनी बंद पडली. लाईन बंद पडताच पहाटेच विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या भागातील वीजपुरवठा बंद केला. सकाळी तुटलेल्या तारा व खांब यांची कंपनीने योग्य देखभाल दुरूस्ती सुरू केली. काही भागांत पर्यायी वीजपुरवठाही सुरू केला. मात्र परंतु शिंदे मळा कडे जाणाऱ्या विद्युत वाहिनीला पर्यायी मार्ग नसल्याने वसंतराव शिंदे, यशवंत शिंदे, काशीनाथ शिंदे यांच्या पिकांना पाणी न मिळाल्याने त्यांची गैरसोय झाली आहे.

पडलेल्या खांबावरील खडसरे बंधूच्या कनेक्‍शन बंद राहिल्याने त्यांच्याही पिकांना गेले 8 दिवस पाणी मिळालेले नाही. त्यातच धोम डावा कालव्याचे पाणी बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. महावितरणचे शाखा अभियंता नायकवडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य केले आहे. मात्र विद्युत वितरण कंपनीचा पडलेला खांब त्वरीत उभे करण्याची यंत्रणा महावितरणच्या वरिष्ठ स्तराकडे असल्याने या कामास विलंब होत आहे. याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी महावितरणच्या वाई विभागीय कार्यालयात दिले आहे. महावितरण कंपनीने सदर दोन्ही खांबाची दुरूस्ती लवकर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.