नवी दिल्ली – आपण मुख्यमंत्री म्हणून सर्व दिल्लीवासियांसाठी काम करणार आहोत. भाजप अथवा कॉंग्रेसच्या मतदारांसाठीही आपण मुख्यमंत्री असणार आहोत, अशी ग्वाही दिल्लीचे नवनियुक्त मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा शपथविधी झाल्यानंतर रामलिला मैदानावरील जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
“निवडणुका संपल्या आहेत. मतदारांनी कोणाला मते दिली, याला आता काहीही अर्थ नाही. कोणत्याही जाती, पक्ष अथवा भूभागाशी संबंधित असलेल्या दिल्लीवासियांसाठी मी मुख्यमंत्री असणार आहे.’ असे ते म्हणाले.
हा केवळ आपला एकट्याचा विजय नाही. तर संपूर्ण दिल्लीचा, प्रत्येक कुटुंबाचा विजय आहे. गेल्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या कामामुळे दिल्लीकरांचे जीवनमान सुधारले आहे. भाजप आणि कॉंग्रेसच्या समर्थकांसाठीही आपण काम करणार आहोत. पक्षीय भेदाने आपल्याला कामापासून रोखलेले नाही, असेही केजरीवाल म्हणाले.