अबुधाबीत स्वामीनारायण मंदिराचे बांधकाम वेगात

दुबई – वर्ष 2018 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराची कोनशिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बसवण्यात आली होती, त्या अबुधाबीतील स्वामीनारायण मंदिराचे बांधकाम वेगात सुरु असून या मंदिर निर्मितीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याचे समजते. संयुक्त अरब अमिरातीच्या अबुधाबी शहरात पहिले भव्य हिंदू मंदिर आकाराला येत असून ते पूर्णपणे भारतीय स्थापत्य शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार निर्मिण्यात येत आहे. त्याची निर्मिती करत असताना लोखंड किंवा पोलादाचा उपयोग केला जाणार नाही.

संयुक्त अरब अमिरातीत 30 लाख भारतीय काम करीत असून त्यांनी अनेक दशकांपासून अशा भव्य मंदिराची मागणी केलेली होती. दोन वर्षापूर्वी या मंदिराच्या निर्मितीला अबुधाबी प्रशासनाने अनुमती दिली. त्यानंतर त्वरित मंदिराचे भूमीपूजन करण्यात येऊन कोनशिला स्थापन करण्यात आली. स्वामीनारायण संस्थेच्यावतीने या मंदिराचे बांधकाम केले जात आहे.

या मंदिराची निर्मिती संपूर्णपणे सिमेंट कॉंक्रिटमध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये फ्लायऍशचाही उपयोग केला जाईल. सर्वसाधारणतः अशा भव्य वास्तू निर्माण करत असताना लोखंड किंवा पोलादाच्या सळयांचा वापर अनिवार्य असतो. तथापि, हे मंदिर त्याला अपवाद ठरणार आहे.

या मंदिराचे खांब, त्यातील विविध मूर्ती व पुतळे तसेच कोरीव काम इत्यादी सजावटीची साधने भारतात तयार करण्यात येत आहेत. तीन हजार हस्तव्यावसायिक कलाकार सध्या या कामात मग्न आहेत. यासाठी पाच हजार टन इटालियन संगमरवर उपयोगात आणण्यात येत आहे. मंदिराचे बाहय बांधकाम 12,500 टन वजनाच्या गुलाबी सॅंडस्टोनमध्ये करण्यात येईल.

हे भव्य मंदिर अबुधाबीच्या समृद्ध संस्कृतीत आणखी मोलाची भर टाकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.