निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भाजपने पाणी तोडले – चेतन तुपे

पुणे -विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे हडपसरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रभाग क्र. 22 मधील पाणीपुरवठा मागील 2 महिन्यांपासून विस्कळीत करण्याचे षड्‌यंत्र सत्ताधाऱ्यांकडून सुरू झाले आहे. नागरिकांना ब्लॅकमेल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना प्रशासनातील अधिकारीही नोकरीच्या भीतीने सहकार्य करत आहेत, हे दुर्दैव आहे. प्रशासनाने अशा राज्यकर्त्यांना भीक न घालता प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा या प्रभागातील नगरसेवकांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तथा हडपसर येथील प्रभाग 22 मधील विद्यमान नगरसेवक चेतन तुपे, स्थानिक नगरसेवक बंडू गायकवाड, नगरसेविका हेमलता मगर आणि पूजा कोद्रे, माजी उपमहापौर निलेश मगर यावेळी उपस्थित होते.

प्रभागालगतच्या नदीला महापूर आलेला असताना आमचा प्रभाग क्र.22, मगरपट्टा सिटी परिसरात मागील 2 महिन्यांपासून पाणीबाणी सुरू आहे. सुरवातीला तांत्रिक कारण वाटले होते. अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांचेही उत्तर हेच आहे. परंतु, त्याचवेळी ही तक्रार भाजपच्या आमदारांकडे केल्यानंतर पाणीपुरवठा लगेच सुरळीत केला जातो. याचा अर्थ केवळ आपण कार्यक्षम असल्याचे भासवण्यासाठीच आमदारांच्या सांगण्यावरून प्रशासनातील अधिकारी प्रभागातील पाणीपुरवठा खंडीत करतात आणि त्यांनी सांगितल्यावर सुरू करतात, असा आरोप तुपे यांनी केला.

आमदारांची ही विकृती जनतेच्याही लक्षात आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात आम्ही कधीही तयार आहोत. परंतु, केवळ मतांच्या राजकारणासाठी नागरिकांना वेठीस धरणे हे खालच्या पातळीचे राजकारण आहे. महापालिकेवर आमची सलग 10 वर्षे सत्ता असताना अशाप्रकारचे सूडाचे राजकारण आम्ही कधीच केले नाही. शहरात कोणतीच पाणीकपात नाही.

धरणांमधून दररोज 1,350 एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. असे असताना आमचे पाणी कोणी पळवले असा प्रश्‍न तुपे यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने अशा लोकप्रतिनिधींच्या धमक्‍यांना न घाबरता तातडीने आमच्या प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आम्हाला जोरदार आंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही या चार नगरसेवकांनी दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)