नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह यांची ग्वाही
“जैश’ देतंय पाण्याखाली दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण
पुणे – “जैश-ए-मोहम्मद’ आपल्या दहशतवाद्यांना पाण्याखाली कारवाया करण्याचे प्रशिक्षण देत असून, त्याची आम्हाला गुप्तचरांद्वारे मिळाली आहे. याबाबत भारतीय नौदल अत्यंत सतर्क असून “जैश-ए-मोहम्मद’ दहशतवादी संघटना समुद्रमार्गे कोणताही हल्ला करू शकणार नाही, अशी ग्वाही नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह यांनी सोमवारी येथे दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमासाठी करमबीर सिंह पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. “जैश ए मोहम्मद’ ही संघटना सध्या दहशतवाद्यांना पाण्याखालून हल्ला करण्याचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती नौदलाला प्राप्त झाली आहे. मात्र, भारतीय नौदलासह सर्वच दले सतर्क असून या कारवायांकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. या दहशतवाद्यांनी अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास, तो निष्फळ ठरवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नौदलप्रमुख म्हणाले, सहा दहशतवादी देशात घुसले असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली आहे. पण, ते कोणत्या मार्गे देशात घुसले, याबाबत निश्चित माहिती नाही. मुंबईत 2008 साली समुद्रीमार्गाने झालेल्या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर यासाठी विशिष्ट व्यूहरचना तयार करण्यात आली असून नौदल यामध्ये प्रमुख भूमिका बजावत आहे. अन्य घटकांसह नौदल यापुढे समुद्रीमार्गाने कोणताही हल्ला होणार नाही, यासाठी आम्ही दक्ष आहोत, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज व कान्होजी आंग्रे यांचा काळ हा भारतीय नौदलाचा सुवर्णकाळ होता, असेही नौदल प्रमुखांनी नमूद केले.