युतीविषयीचा सस्पेन्स कायम असल्याची कुजबूज
मुंबई : विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत भाजप आणि शिवसेनेचे अखेर जमल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, भाजपने विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघांमधील तयारीची चाचपणी केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे युतीविषयीचा सस्पेन्स कायम असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून मागील काही दिवसांपासून वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, युतीची घोषणा लांबल्याने भुवया उंचावल्या गेल्या आहेत. अशातच गुरूवारी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक झाली. त्या बैठकीला महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीत शिवसेनेबरोबरच्या जागावाटपाचे सुत्र भाजपने निश्चित केल्याचे वृत्त देण्यात आले. मात्र, दिल्लीतील बैठकीत भाजपने सर्व जागांवरील तयारीचा आढावा घेतल्याची माहिती सुत्रांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे भुवया पुन्हा विस्फारल्या गेल्या आहेत.