लखनौ – कानपूरस्थित अत्तर व्यावसायिक पियूष जैन नेमका कुठल्या राजकीय पक्षाचा निकटवर्तीय आहे, या प्रश्नावरून सध्या उत्तरप्रदेशचे राजकारण तापले आहे. तशात समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जैन सपचा समर्थक नसल्याचा दावा केला. एवढेच नव्हे तर, भाजपने चुकून स्वत:च्याच समर्थक व्यावसायिकाविरोधात छापासत्र घडवल्याची मिश्कील टिप्पणीही केली.
विविध कर यंत्रणांनी काही दिवसांपूर्वी जैन याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. त्या कारवाईवेळी तब्बल 257 कोटी रूपयांची रोकड, 25 किलो सोने आणि 250 किलो चांदी जप्त करण्यात आली. त्या प्रचंड जप्तीवरून भाजप आणि सपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. जैनचे सपशी लागेबांधे असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. तो आरोप अखिलेश यांनी उन्नावमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला.
सप नेते पुष्पराज जैन यांच्याऐवजी पियूष जैनवर छापे टाकण्यात आले. समाजवादी अत्तर पियूष जैनने नव्हे; तर पुष्पराज जैन यांनी आणले. मात्र, छापे टाकताना डिजिटल चूक झाली. त्या व्यावसायिकाचे फोन रेकॉर्ड तपासा. त्यातून त्याच्या संपर्कात अनेक भाजप नेते असल्याचे उघड होईल, असे अखिलेश म्हणाले.
सप नेत्याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याच्या बातम्या सुरूवातीला वृत्तवाहिन्यांनी दिल्या. मात्र, सत्य समजल्यावर त्यांनी तो उल्लेख टाळला. नोटाबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी अयशस्वी ठरल्याचे प्रचंड रोकड जप्तीतून सिद्ध झाले, अशी टिप्पणीही त्यांनी केली. भाजपच्या निर्देशावरून विविध केंद्रीय यंत्रणा कारवाई करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. त्याचा संदर्भ घेत अखिलेश यांनी भाजपवर निशाणा साधला.