वॉशिंग्टन – चीनमध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला एवियन फ्लू म्हणजेच बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता अमेरिकेतही एका व्यक्तीला एच-5 बर्ड फ्लूची लागण झाल्याचे वैद्यकिय चाचणीतून समोर आले आहे.
संबंधित व्यक्ती पोल्ट्री फार्ममध्ये काम करत असून एच-5एन-1 बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या पक्ष्यांना मारण्याचे काम करतो. त्यातूनच त्याला हा संसर्ग झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. याप्रकरणी युएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंटेन्शन सीडीसीने खुलासा केला असून एच-5 बर्ड फ्लू विषाणूच्या विशिष्ट व्हेरियंटशी संबंधित असलेले हे दुसरे मानवी प्रकरण आहे. तर संयुक्त राज्य अमेरिकेतील हे पहिलेच प्रकरण असल्याचे म्हटले आहे.
तसेच सीडीसीने एच-5 बर्ड फ्लूचा संसर्ग मानवासाठी धोकादायक नसल्याचा दावा केला आहे. तसेच याचा संसर्ग पसरू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले. एवियन फ्लूचा संसर्ग झालेल्या पोल्ट्री आणि जंगली पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्यांवरही लक्ष असल्याचे सीडीसीने सांगितले.