चीनमध्ये करोनाने डोके वर काढले असताना आता बर्ड फ्लूचा H3N8 स्ट्रेनच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. येथे 4 वर्षाच्या मुलाला ही लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते लोकांमध्ये हा संसर्ग पसरण्याचा धोका अजूनही कमी आहे.
चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, मध्य हेनान प्रांतात राहणाऱ्या एका 4 वर्षाच्या मुलाला ताप आणि इतर लक्षणांअसल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला या मुलाच्या चाचण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये बर्ड फ्लूचा H3N8 स्ट्रेन या मुलामध्ये दिसून आला. हेल्थ कमिशनने एका निवेदनात म्हटले आहे की मुलाच्या कुटुंबाने घरी कोंबडी पाळली होती आणि हे कुटुंब जंगली बदकांनी भरलेल्या भागात राहत होते.
या मुलाला थेट पक्ष्यांकडून संसर्ग झाल्याचे आयोगाने म्हटले आहे. या मुलाला झालेला संसर्ग लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका कमी असल्याचे तज्ञांचे मत आहे. तथापि, असे असूनही, आरोग्य विभागाकडून जनतेला मृत किंवा आजारी पक्ष्यांपासून दूर राहण्यास आणि ताप किंवा श्वसनाची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, बर्ड फ्लूचे H3N8 चे प्रकरण पहिल्यांदा 2002 मध्ये उत्तर अमेरिकेत मिळाले होते. यानंतर घोडे, कुत्रे आणि अन्य् प्राण्यांना या संसर्गाने ग्रासले होते. परंतु या संसर्गाचा प्रभाव मानवांमध्ये दिसला नव्हाता.