पुणे – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) पुणे शहरातील वीज बिल भरणा पावत्यांमध्ये बदल केला आहे. ग्राहकांना आता संगणकीकृत छापील कागदाऐवजी (प्रिंटेड) कोऱ्या कागदावर संगणकीकृत क्रमांक छापलेल्या पावत्या दिल्या जाणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नऊ विभागांमध्ये सोमवारपासून (दि.16) यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नव्याने सुरू झालेल्या या सुविधेमुळे खासगी बील भरणा केंद्राच्या गैरव्यवहाराला चाफ बसणार आहे.
ग्राहकांनी केलेल्या वीजबिलाचा भरणा अचूक आणि वेळेत त्यांच्या खात्यावर होण्यासाठी “महावितरण’कडून ग्राहकांना संगणकीकृत क्रमांक असलेल्या छापील पावत्या दिल्या जाणार आहेत. मुंबईमधील ग्राहकांना ही सुविधा एप्रिल 2019 पासून सुरू केली आहे. त्यानुसार, पुणे शहरासह राज्यातील 25 विभागांमध्ये येत्या सोमवारपासून हा उपक्रम राबविला गेला आहे. पुणे शहरात कोथरूड, शिवाजीनगर, रास्तापेठ, बंडगार्डन, नगर रोड, पद्मावती आणि पर्वती, पिंपरी-चिंचवडमधील भोसरी आणि पिंपरी या विभागांमध्ये राबवण्यात येत आहे.
बिल भरल्याची खात्री करता येणार
अनेकदा खासगी बिल भरणा केंद्रात ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता ग्राहकांना संबंधित संगणकीकृत क्रमांक वापरून “महावितरण’चे संकेतस्थळ किंवा मोबाइल ऍपवर वीजबिल भरल्याची खात्री करता येणार आहे. पण, ग्राहकांनी भरणा पावतीवर संगणकीकृत क्रमांक असल्याची खातरजमा करावी. हस्तलिखित पावत्या नाकाराव्यात. तसेच, याबाबत महावितरण कार्यालयाला माहिती देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.