Bilawal Bhutto PM Candidate : भारताप्रमाणे शेजारी पाकिस्तानमध्येहे सार्वत्रिक निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमध्ये येत्या ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. देशातील सर्व प्रमुख पक्षांनी यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पाकिस्तनच्या नवीन पंतप्रधानपदासाठी मोठ्या पक्षांनी आपल्या उमेदवाराची नावे देखील घोषित केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
काश्मीरविरोधात भारत विरोधी गरळ ओकणारे पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) पक्षाचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. एका इंग्रजी वर्तमापत्राच्या वृत्तानुसार, बिलावल भुट्टो यांची पंतप्रधानपदासाठी निवड करण्याचा निर्णय केंद्रीय कार्यकारी समितीने (CEC) घेतला असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय कार्यकारी समितीने (CEC) लाहोरमधील बिलावल हाऊसमध्ये आगामी निवडणुकांसाठी पीपीपी पक्षाच्या प्रचाराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. सीईसीच्या बैठकीत पीपीपी पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यावरही चर्चा झाली.
पीपीपीने निवडणूक जाहीरनाम्यात तरुण आणि महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष दिले आहे. याशिवाय त्यांनी जाहीरनाम्यात रोजगार, आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बिलावल भुट्टो यांनी नेहमीच भारत विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे जर ते पाकच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाले तर दोन्ही देशातील संबंध कसे प्रस्थापित होतील हे पाहणे गरजेचे आहे.