नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती जेडीयूच्या नेत्यांनी दिली. इंडिया आघाडीतून बाहेर पडत पुन्हा एनडीएत सहभागी झाल्यानंतर नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यात पहिली भेट होणार आहे. नितीश कुमार सरकार 12 फेब्रुवारीला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याच्या केवळ पाच दिवस आधी ही बैठक होणार आहे.
बिहार विधानसभेत नितीश कुमार यांना बहुमत सिद्ध करायचे आहे. बिहारमध्ये बहुमताचा आकडा १२२ असून नितीश कुमार यांना १२८ आमदारांचा पाठिंबा आहे. कॉंग्रेसने आपल्या १६ आमदारांना हैदराबादमध्ये हलविले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेणार आहेत. राज्यातील राज्यसभा निवडणुकीशी संबंधित मुद्द्यांवरही मुख्यमंत्र्यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. बिहारमध्ये राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत असून, त्यासाठी २७ फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. या सहा जागांपैकी जेडीयू आणि राजदकडे प्रत्येकी दोन-दोन जागा आहेत. तर भाजप आणि कॉंग्रेसकडे प्रत्येकी एक-एक जागा आहे.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयू-भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष एकत्र लढले होते. मात्र, आता 2024 च्या निवडणुकीत समीकरणे बदलताना दिसतात. कारण यावेळी जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांचाही एनडीएमध्ये समावेश आहे. यावेळी लोक जनशक्ती पक्षही पशुपती पारस आणि चिराग पासवान अशा दोन भागांत विभागला गेला आहे. अशा स्थितीत 2019 प्रमाणे भाजप 17 जागांवर आणि जेडीयू 17 जागांवर निवडणूक लढवणार असेल तर 6 जागांची विभागणी कशी होणार, यासह अनेक प्रश्न असून एनडीएमध्ये अजूनही जागावाटपाची चर्चा सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.