बिहारला महाराष्ट्राकडून गुंतवणुकीची अपेक्षा

पुणे – बिहारमधील कायदा-सुव्यवस्था, वीज, रस्ते, पाणी व पायाभूत सुविधांची परिस्थिती सुधारल्याचा दावा करून बिहारच्या वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांनी महाराष्ट्रातील उद्योजकांकडून गुंतवणुकीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

बिहारमधील उद्योग विभागातर्फे “सीआयआय पुणे’च्या सहकार्याने बिहार इन्व्हेस्टर्स रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बिहारचे उद्योग मंत्री श्‍याम राजक, गुंतवणूक आयुक्त आर. एस. श्रीवास्तव, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र प्रसाद, सीआयआय पुणेच्या एमएसएमई समितीचे समन्वयक सुधीर गुर्टू आदी उपस्थित होते.

या प्रसंगी खाद्य प्रक्रिया, वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा इत्यादी क्षेत्रात असलेल्या संधींविषयी सादरीकरण केले. श्‍याम राजक म्हणाले लिची, मका खाद्य प्रक्रिया उद्योगाला मिळू शकतात. ते म्हणाले, पर्यटन क्षेत्रात देखील गुंतवणुकीकरता आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.

बिहारचा विकास दर हा 11.3 टक्के असून तेलंगाणा, आंध्र प्रदेश, गुजरातसह विकासदरात दोन अंकी वाढ होत असलेल्या चार राज्यांपैकी एक आहे. पूर्व भारतात बिहार मध्यस्थानी असून त्याचा फायदा होत आहे. बिहारमध्ये गुंतवणुकीकरिता ही वेळ योग्य आहे. येथील 200 स्टार्ट अप्सना राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. स्टार्ट अप्ससाठी आम्ही 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.