पंतप्रधानांच्या दौरा बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त बंदोबस्त असताना रस्त्यावर लावलेली गाडी काढायला लावल्याने महिला पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घालून पोलीस शिपायाच्या अंगावर गाडी घालून जखमी करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.

अब्दुल गुलाम रसूल पटेल (वय 38, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सागर कोतवाल यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना एअरपोर्ट रोडवरील अभिजित हॉटेलजवळ 6 डिसेंबरला रात्री साडेदहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळावरून राजभवन येथे मुक्‍कामाला जाणार होते. त्यासाठी एअरपोर्टपासून राजभवनपर्यंत बंदोबस्त लावण्यात आला होता. एअरपोर्ट रोडवर रस्त्याच्याकडेला काही वाहने लावली होती. ती वाहने काढून घेण्यास महिला सहायक पोलीस निरीक्षक तांदळे यांनी पटेल याला सांगितले. त्यावरून त्याने हमरी तुमरीवर येऊन, त्यांच्याशी हुज्जत घालू लागला अचानक त्याने गाडी चालू करून सागर कोतवाल यांच्या अंगावर घातली. त्यात कोतवाल यांच्या उजव्या पायाला मार लागला. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल येरवडा पोलिसांनी अब्दुल पटेल याला अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.