भारताकडून ‘या’ देशाला होणार ब्रह्मोस क्षेपणास्त्राची विक्री

नवी दिल्ली : ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच फिलीपाईन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्राची विक्री करण्यात येणार आहे. हे क्षेपणास्त्र विकत घेणारा फिलीपाईन्स हा पहिला देश बनू शकतो. सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्‍चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. 2020 पर्यंत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. एका इंग्रजी वर्तमापत्राच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.

वेगवेगळ्या चाचण्यानंतर फिलीपाईन्सच्या लष्कराने ब्रह्मोस विकत घेण्याचे सुनिश्‍चित केले आहे. आता फक्त किंमतीवरुन चर्चा सुरु आहे. या संरक्षण व्यवहारासाठी भारताने फिलीपाईन्सला 10 कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे. पण फिलीपाईन्स स्वत:च्या पैशाने हे क्षेपणास्त्र विकत घेण्याचा विचार करत आहे. त्यासाठी पुढच्यावर्षीच्या अर्थसंकल्पात ब्रह्मोसच्या खरेदीसाठी तरतूद करण्याचा फिलीपाईन्सचा विचार आहे. भारतीय लष्कर आणि नौदलाने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.