पुणे – मुंबई आणि पुणे महापालिका निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही युती कशी राहणार असा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढविण्याचं ठरल आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार आहे. यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्याबद्दल चर्चा होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ज्या शहरात,ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा, असंही राऊत यांनी सुचविले आहे. महाविकास आघाडीने महापालिका निवडणुका एकत्र लढविल्यास भाजपसमोर मोठे आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद अधिक आहे. त्या तुलनेत येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद कमी आहे. तर पिंपरी चिंचवड, पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद शिवसेनेपेक्षा मोठी आहे. या दोन ठिकाणी निवडणुका कशा लढवायच्या याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा करू, असंही राऊत यांनी सांगितले.