नाशिक – राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिलाच सभा नाशिकमधील येवला येथे पार पडली. या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
अशात छगन भुजबळ यांनी नाशिकात जनतेशी बोलतांना अनेक खुलासे केले. भुजबळ म्हणाले,’शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले त्यावेळी मीच पहिला होतो ज्याने त्यांना समर्थन केले. माझ्याच बंगल्यावर पक्ष स्थापनेची बैठक झाली व चिन्ह, नाव काय असावे यावर चर्चा झाली.’
ते पुढे म्हणाले,’शरद पवार यांचे माझ्यावर अधिक प्रेम असल्यानेच त्यांनी माझ्या येवला मतदारसंघात पहिलीच सभा घेतली’ असा उपरोधिक टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. शरद पवार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आपण त्यांच्या सोबत जाऊ नये म्हणून त्यावेळी काँग्रेसच्या दिल्लीतील जवळपास सर्वच नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला होता व महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच असणार असा शब्द दिला होता. परंतु आपण शरद पवार यांची साथ सोडली नाही असा गौप्यस्फोटही छगन भुजबळ यांनी केला
दरम्यान,शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला ते म्हणाले,’माझ्याकडून चूक झाली मी तुमची माफी मागायला आलोय. मी चुकीच्या माणसाची निवड केली असं म्हणत शरद पावर यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.