नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात आहे. त्याची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान बिश्नोईने मोठा खुलासा केला आहे. अनेक नेते, व्यावसायिक त्याला धमकी देणारे कॉल करण्यासाठी स्वतःच पैसे देतात. ही मंडळी पोलीस सुरक्षा मिळावी यासाठी असे करत असल्याचा मोठा खुलासा बिश्नोईने केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
लॉरेन्स बिश्नोईची खलिस्तानी संघटनांकडून झालेल्या फंडिंगप्रकरणी एनआयएकडून चौकशी सुरू त्याने ही माहिती दिली. लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाबमधल्या बठिंडा येथील तुरुंगात कैद आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिश्नोईने तपास अधिकाऱ्यांना, “तो मद्य विक्रेते, कॉल सेंटर्सचे मालक, अंमली पदार्थ विकणारे, बांधकाम व्यावसायिकांकडून दर महिन्याला २.५ कोटी रुपयांची खंडणी वसूल करत होता. तसेच त्याने सांगितलं की, अलिकडच्या काळात त्याला अनेक नेत्यांनी, व्यावसायिकांनी धमकी देणारे कॉल करण्यासाठी पैस दिले आहेत. पोलीस सुरक्षा मिळावी यासाठी हे लोक मला पैसे देऊन धमकी देणारे कॉल करायला सांगतात,” अशी माहिती दिली आहे.
चौकशीत बिश्नोईने , त्याच्या बिझनेस मॉडेलमध्ये अनेक सहकारी आहेत. त्याचे हे साथीदार अनेक तुरुंगांमध्ये कैद असलेले गँगस्टर्स आहेत, जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहेत. उत्तर प्रदेशात धनंजय सिंह, हरियाणात काला जठेरी, राजस्थानमध्ये रोहित गोरा आणि दिल्लीतल्या तुरुंगात कैद असलेले रोहित मोई आणि हाशिम बाबा यांचा समावेश आहे, असे सांगितले.
तसेच अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणी बिश्नोईने, १९९८ मध्ये सलमानचं नाव काळवीट शिकार प्रकरणात पुढे आलं तेव्हापासून सलमान माझ्या निशाण्यावर आहे. खरंतर बिश्नोई समाजात हरीण-काळवीट या प्राण्यांना खूप पवित्र मानलं जातं. बिश्नोई म्हणाला जर सलमानने माफी मागितली तर आम्ही त्याला माफ करू, असे त्याने पुन्हा एकदा म्हटले आहे.