मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना ही धमकी ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचले आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह काही वेळात मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत.
एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवारांना ही धमकी देण्यात आली असून “तुमचाही दाभोलकर होणार”, अशी पोस्ट या अकाऊंटवर करण्यात आली आहे. तसेच, या धमकीबरोबरच शरद पवारांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे.
यासंदर्भात गृहविभागाने लक्ष घालण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली आहे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरु आहे. आणि जर काही बरंवाईट झालं तर त्याची पूर्णपणे जबाबदारी गी गृहखात्याचे असेल असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.