मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून हिंदीमध्ये शिवीगाळ करत राऊत यांना धमकी दिल्याचे समजते.
संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना कॉल करत अज्ञाताने तुम्हा दोघांनाही मारून टाकू अशी धमकी दिल्याचे समजते. सुनील राऊत यांनी याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग देखील पोलिसांना दिले आहे. यापूर्वी देखील संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
सकाळची नऊची बडबड बंद करा.. महिन्याभरात ही बडबड बंद झाली पाहिजे असं म्हणत अज्ञात व्यक्तीने फोनवरून धमकी दिली. संजय राऊत यांच्यासह सुनील राऊत यांनी मुंबई पोलिसांना या प्रकरणाची सर्व माहिती देखील सुपूर्त केली असल्याचे समजते.