जळगाव – राज्याचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. याबाबतची माहिती स्वतः खडसे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे.
याबाबत माहिती देताना खडसे यांनी, “आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने आणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.” असं ट्विट केलं आहे.
आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने आणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 1, 2020
प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे आज अमळनेर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर ते कार्यकर्त्यांसह गाडीने जळगावकडे येत होते. धरणगाव जवळ असतानाच अचानक गाडीचा टायर अचानक फुटला. गाडीचा वेग कमी असल्याने व चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना पक्षातर्फे विधानपरिषदेची उमेदवारी व मंत्रिपद देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत.