नागपूर – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुर येथे सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख नेते सध्या नागपुरात आहेत. सोमवार दि. 19 डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. करोना संकटानंतरचं नागपूरमध्ये होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनाचे नियोजन जवळपास 14 दिवसांचे आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरल असल्याचं दिसून येत आहे. विरोधकांनी एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, या अधिवेशना मध्ये काही आमदार आणि कर्मचाऱ्यांना सर्दी, खोकला झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे 30 आमदारांसह 611 जणांची आरोग्य तपासणी होणार आहे. यामध्ये 15 आमदारांना सर्दी, खोकला झाला आहे. तर काही आमदारांना मधुमेह आणि उच्चरक्तदाब देखील आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
सध्या जगाला धडकी भरवणारा करोना जिथून जन्माला आला त्याच चीनमध्ये पुन्हा एकदा या व्हायरसने डोके वर काढले आहे. आणि त्याच पार्श्वभुमीवर भारतात देखील खबरदारीचे उपाय राबवण्यात येत असून, आरोग्य प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.