मुंबई : अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. बुकी अनिल जयसिंघानी यांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. मुंबई दलाच्या गुन्हे शाखेने वरिष्ठांच्या आदेशानुसार मोठी कारवाई केली असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून फरार असणारा अनिल जयसिंघानी याला अटक करण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवण्यात आले. अनिल जयसिंघानी इंटरनेटचा वापर करून अनेकांच्या संपर्कात होता. आरोपीवर विविध राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ओळख लपवून राहत होता.
Accused Anil Jaisinghani arrested from Gujarat by Mumbai Crime Branch for allegedly threatening and blackmailing Amruta Fadnavis, wife of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis. He was on the run.
— ANI (@ANI) March 20, 2023
आरोपी हा महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरातच्या बरदोली येथे गेल्याची माहिती समोर आली होती. या आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली होती. आरोपीने 72 तास गुजरातमध्ये पोलिसांना चकवा दिला होता. रात्री 11: 45 ला त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अनिल जयसिंघानी याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर आणि त्याचा एक नातेवाईक यालाही अटक करण्यात आली आहे.
अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीला देखील अटक करण्यात आली आहे. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली, पुस्तकाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर वडिलांची फसवणूक झाल्याचे सांगत मदत करण्याची मागणी केली होती.