नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी अजित डोवाल यांच्या सुरक्षेसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीने कारसहीत अजित डोवाल यांच्या सरकारी बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यन, या सर्व गोंधळाच्या परिस्थितीमध्ये बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीला रोखले आणि मोठा अनर्थ टळला.
सध्या या व्यवक्तीला दिल्ली पोलिसांच्या विशेष तुकडीच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सकाळी घडलेल्या या प्रकरणानंतर संबंधित व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेऊन दिल्ली पोलिसांच्या विशेष टीमकडे तपासाठी सोपवले आहे. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा इसम आपल्या शरीरामध्ये चीप असल्याचे सांगत होता.
मला कंट्रोल केले जात असल्याचा दावा या व्यक्तीकडून केला जात होता. मात्र तपासामध्ये या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोणतीही चीप आढळून आली नाही, अशी एका इंग्रजी वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती ही कर्नाटकमधील बंगळुरुची आहे. दिल्ली पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकाबरोबरच विशेष पथकाककडून आता या व्यक्तीची चौकशी सुरु आहे.
भारताचे जेम्स बॉण्ड नावाने अजित डोवाल यांना ओळखले जाते. ते पाकिस्तान आणि चीनविरोधात भारताचे सुरक्षा धोरण ठरवणाऱ्या महत्वाच्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. डोवाल यांना अनेक दहशतवादी संघटनांपासून धोका आहे. मागील वर्षी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी डोवाल यांच्या कार्यालयाची पहाणी केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणानंतर डोवाल यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.