वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन विमानाच्या पायऱ्या चढता तीनदा त्यांचा तोल गेल्याचे आणि ते पडत असल्याचे दर्शवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याची जोरात चर्चा सुरू आहे. अर्थात बायडेन यांनी स्वत:ला सावरले त्यामुळे ते पडले नाहीत. मात्र या प्रकारामुळे बायडेन यांच्या आरोग्यसंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
दरम्यान, जोरात हवा सुरू असल्यामुळे ही घटना घडली असल्याचे बायडेन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अध्यक्ष बायडेन हे शुक्रवार अटलांटा येथे निघाले होते. एअरफोर्स 1 या आपल्या विशेष विमानाच्या पायऱ्या ते चढत असताना त्यांचा तोल गेला आणि ते पायऱ्यांवरच अडखळले. मात्र असे एकदा नाही तर तीन वेळा झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना तोंड फुटले.
बायडेन तीन वेळा पायऱ्यांवर घसरले आणि नंतर पुन्हा हातांवर बल देउन ते पुन्हा उठल्याचे संबंधित व्हिडीओत दिसते आहे. साइड रेलींगला धरत ते कसेबसे वर चढले अन आत जाऊन बसल्यानंतर विमानाने उड्डाण केले.
दरम्यान, या मुद्द्यावर चर्चा सुरू झाल्यानंतर व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने खुलासा केला आहे. अध्यक्षांचे आरोग्य शंभर टक्के उत्तम असून पायऱ्यावर चुकीच्या पध्दतीने पाउल ठेवले गेल्यामुळे त्यांचा तोल गेला असे प्रवक्त्या कॅरिन जीन पियरे यांनी म्हटले आहे.