जेनेव्हा – करोनाच्या पहिल्या लाटेत ब्राझिलमध्ये अक्षरश: मृतांचा खच पडला होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असे वाटत असतानाच पुन्हा ब्राझीलमध्ये दुसऱ्या लाटेने शिरकाव केला आहे. येथे आतापर्यंत 2 लाख 78 हजार करोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे, तर रूग्णांची संख्या 1 कोटी 14 लाखांपेक्षा जास्त आहे. आता दुसऱ्या लाटेने ब्राझीलची चिंता आणखीन वाढली आहे. देशातल्या 15 राज्यांतील आयसीयू 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत.
रिओ दे जेनेरिओ आणि साओ पाऊलो या शहरांमध्ये भयावह स्थिती आहे. पोर्टो ऍलेग्रे आणि कॅम्पो ग्रॅंड शहरातील आयसीयू फूल होण्याचा मार्गावर आहेत. पी- 1 हा करोनाचा नवा स्ट्रेनच दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरला आहे.
-1 स्ट्रेन हा मूळ करोना विषाणूपेक्षा दुप्पट वेगाने पसरतो. जुन्या करोनाला रोखण्यासाठी तयार झालेल्या प्रतिकार शक्तीलाही चकवा देण्याची क्षमता पी-1मध्ये आहे. करोनातून ब-या झालेल्या रूग्णांना P-1स्ट्रेनमुळे लवकर लागण होऊ शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ब्राझीलमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होते आहे. संक्रमणाचा वेग असाच राहिला तर जग पुन्हा धोक्यात येऊ शकते.
तसेच ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष बोलसेनारो यांनी सुरूवातीपासूनच करोनाला गांभीर्याने घेतले नाही. करोना म्हणजे साधा सर्दी-ताप असे म्हणून दुर्लक्ष केले. स्वत: करोना बाधित झाल्यानंतरही मित्रांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्या. इतकेच नाही तर अर्थव्यवस्था धोक्यात येईल असे कारण देऊन लॉकडाऊनला नकार दिला. ब्राझीलमधल्या नव्या स्ट्रेनबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. अनेक शास्त्रज्ञांनी ब्राझील ही नैसर्गिक प्रयोगशाळा झाली असल्याची भीती व्यक्त केली आहे. करोनाच्या या नव्या स्ट्रेनला जगात फार पसरू न देणे, हे सर्वांसमोरचे आव्हान आहे.