पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांचा पुतळा परिसरातील सुशोभीकरण कामाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य आणि अधिसभा सदस्य आदी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याशेजारी हे काम करण्यात येणार आहे. येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित महिला आणि विद्यार्थांना प्रेरणा देणारे भित्तीचित्रे साकारण्यात येतील. तसेच येथील उद्यानाचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
बागेच्या परिसरात पदभ्रमण मार्ग, विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. येथे विविध समारंभ व कार्यक्रमांसाठी बैठकीची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. यासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होईल, असे कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले. पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांचा पुतळा परिसरातील सुशोभीकरण रखडले होते. याबाबत “प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला.