सातारा, (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपच्यावतीने मी आहेच असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचाराची पूर्णतः आखणी करून मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे.
पहिल्या टप्प्यात प्रभागातील मतदार याद्यांनुसार लोकांशी गाठीभेटी, त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद आणि प्रमुख गावांमध्ये नागरिकांशी अनौपचारिक चर्चा अशा उपक्रमांवर उदयनराजे यांनी जोर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव तालुक्यात जोरदार भिरकिट केली. भाजपच्यावतीने उमेदवारांच्या सात याद्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या. मात्र, अजूनही उदयनराजे भोसले यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही.
तरीही पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झाले आहे, असे ठाम विधान करत उदयनराजे भोसले आणि राजे समर्थक प्रचाराला लागले आहेत. महायुतीच्या मेळाव्यामध्ये उदयनराजे यांनी केवळ दहा मिनिटे हजेरी लावली. उदयनराजे यांच्या गाडीचे सारथ्य करत कराड दक्षिणचे नेते अतुल भोसले त्यांना कार्यक्रम स्थळी घेऊन आले.
महायुतीच्या उमेदवारासाठी सातारा, वाई, कराड या तीन ठिकाणी कार्यकर्ता मेळावे होणार आहेत. हा पक्षाचा अजेंडा असला तरी उदयनराजे स्वतः निवडक कार्यकर्त्यांसह भिरकिट करू लागले आहेत.उदयनराजे यांनी दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, नेते, जिल्हाध्यक्ष यांच्या गाठीभेटींवर जोर दिला होता. उन्हाची रखरख वाढत असतानाही त्याची तमा न बाळगता त्यांनी जनसंवादावर भर दिला आहे.
कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण हे तीन मतदारसंघ लोकसभेच्या उमेदवाराला निर्णायक आघाडी देऊ शकतात हे लक्षात घेऊन या तीन विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करत खासदार उदयनराजे भोसले या विभागात जनसंवाद कार्यक्रमासाठी पोहोचणार आहेत.
सातारा शहरात घरटी संवाद
सातारा शहरात आणि हद्दवाढ क्षेत्रात एकूण एक लाख 81 हजार मतदान आहे. त्यासाठी सातारा विकास आघाडीची विशेष मोहीम उघडली गेली असून सर्व नगरसेवकांना मतदार यादीनिहाय घरटी जनसंवाद साधण्याचे आवाहन उदयनराजे भोसले मित्र समूहाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यानुसार नगरसेवक आपापल्या पद्धतीने जनसंवाद करत असून त्याचा फीडबॅक रोजचा रोज घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.