नगर – भिंगार शहराचा अहमदनगर महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा अभिप्राय राज्य सरकारने महापालिका आयुक्तांकडे मागितला आहे. त्यामुळे आता भिंगार शहर महापालिका हद्दीत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, नगर शहर विधानसभा मतदारसंघात नगर शहरासह भिंगारचाही समावेश आहे. त्यामुळे आता भिंगार जर महापालिकेमध्ये समविष्ट झाले तर नगर शहर विधानसभा मतदारसंघ अहमदनगर महापालिका कार्यक्षेत्राचा होणार आहे.
भिंगार छावणी मंडळाची करोनामुळे लांबलेली. सात वर्षांनी जाहीर झालेली निवडणूक नुकतीच रद्द झाल्याने त्याचवेळी भिंगारचा समावेश अहमदनगर मनपा हद्दीत होण्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव सुशीला पवार यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना पत्र पाठवून, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या महापालिका हद्दीच्या क्षेत्रात समाविष्ट करावे किंवा कसे, याबाबत आपले स्पष्ट मत व या बदलाच्या अनुषंगाने आवश्यक गरजांची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याता भिंगार कॅन्टोन्मेंट परिसर नगर शहराच्या हद्दीत समाविष्ट होऊन भिंगार हे आता केडगावप्रमाणेच नवे उपनगर होणार आहे.
नगर विकास विभागाने राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्डांचा त्यांच्या लगत असलेल्या महापालिकांमध्ये समावेश करण्यासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीच्या माहितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. भिंगार (अहमदनगर), पुणे, पिंपरी-चिंचवड, खडकी, देहू, देवळाली, औरंगाबाद व नागपूर येथील कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिका आयुक्तांना हे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार भिंगार येथील अहमदनगर छावणी परिषदेचे अहमदनगर महापालिकेत विलिनीकरण करता येईल का? विलिनीकरण केल्यास महापालिकेचे सुधारित क्षेत्र, लोकसंख्या किती होईल तसेच प्रभागरचना व अन्य काय बदल होतील, या संदर्भातील सविस्तर अहवाल राज्य सरकारने महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना मागितला आहे. त्यामुळे भिंगार शहर महापालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता वाढली आहे. शासनाने मागवलेल्या या माहितीमुळे भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या अहवालामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाची सध्याची हद्द, लोकसंख्या, त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट हद्द महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरमहापालिकेची हद्द आणि लोकसंख्या किती होईल, याबाबतची माहिती राज्य सरकारनेमागितली आहे.
सदस्य वाढणार व बजेटही वाढणार
भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सात सदस्य आहेत व नगर मनपाचे 68 नगरसेवक आहेत. भिंगार शहराचा समावेश नगर मनपामध्ये झाल्यास दोन्हीमिळून नगरसेवक संख्या 75 होईल, स्वीकृत नगरसेवकही 8 होतील. मनपाचे बजेटही वाढणार आहे. भिंगार हे नगरचे नवे उपनगर झाल्यावर तेथील स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य व नागरी सुविधांची जबाबदारी मनपावर येणार आहे.अमृत पाणी योजना पूर्ण झाल्यावर वाढीव पाणी भिंगारला देण्याची ग्वाही मनपाने याआधीचदिली आहे. पण आता वाढीव पाणी कर्तव्य म्हणून द्यावे लागणार आहे.