श्रीक्षेत्र परिसरात धुके, बोचरी थंडी अन् पाऊस
मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात पसरलेले धुके, बोचरी थंडी आणि पावसात अधिक श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी भीमाशंकर महाराज की जय घोषाने परिसर दुमदुमला. सुमारे चार लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले .
भीमाशंकर येथे भाविकांचा शनिवार, रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी गर्दीचा महापूर लोटला होता. यातच सुमारे चार लाख भाविकांनी दर्शन घेतले, तर सोमवारी दर्शनासाठी गर्दी मोठ्या प्रमाणावर होती. श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र असून, एक चांगले पर्यटनस्थळ असल्याने येथे रोज मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटकांची गर्दी होत आहे.
यामध्ये सर्वांत जास्त गर्दी शनिवार, रविवार आणि अधिक श्रावण महिन्यात भाविक मोठ्या प्रमाणात भर पावसात, दाट धुक, बोचऱ्या थंडीत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. मंदिर परिसरात मुखदर्शन पास सुविधेमुळे दर्शन सुलभ होत असल्याचे भाविकांनी सांगितले.
वन्यजीव विभागाकडून भाविकांची लूट
कोकणातून कर्जत ते खांडजमार्गे गणपती घाटाने पायी भाविकांचा मोठा ओघ सुरू आहे; पंरतु घाटात मध्यवर्ती पायपिट करून आल्यावर वन्यजीव विभागाकडून प्रतिभाविक 60 रुपयांप्रमाणे पैसे घेऊन एक प्रकारे मोठी लूटमार चालू आहे. त्यामुळे पायी येणारे भक्त-भाविकानी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दोन किलोमीटरची पायपीट
सतत पडणाऱ्या भरपावसात पायरीमार्गावरील छत काढलेल्या ठिकाणी प्लॅस्टिक कागदाने अच्छादित केलेल्या आणि गळक्या छतातून पडणाऱ्या पावसामुळे दर्शनबारीत भाविक भिजत आहेत. एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे पुरेशा एसटी गाड्या नसल्याने भाविकांना दोन किलोमीटर पावसात पायी चालत जाऊन महादेवाचे दर्शन घ्यावे लागत असल्याने भाविकां आतोनात हाल झाले.