पिंपरी – राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या तीन रुग्णालयात सुरू करण्याच्या प्रस्तावाला ब्रेक लागला आहे. महापालिका प्रशासनाकडून वर्षभरापूर्वी संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्याप त्या बाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद आला नसल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून 5 लाख रूपये एवढे करण्याचा निर्णय 28 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. 28 जुलै पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र प्राप्त नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त झाले आहे. अशाप्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. या योजनेचा लाभ सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव आणि वायसीएम या दोन रुग्णालयांत मिळत आहे. तर आकुर्डी, जिजामाता आणि भोसरी या तीनही रुग्णालयात याचा लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने पाठविला आहे. वर्ष होऊनही त्याला अद्याप संबंधित राज्य शासनाच्या विभागाकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांना या योजनेचा लाभ होताना दिसत नाही.
नव्याने वाढविलेले लाभ
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पण 1 हजार 356 एवढे उपचार समाविष्ट करण्यात येत आहे. उपचारांची संख्या 360 ने वाढविण्यात येत आहे. 119 उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी उपचार खर्च मर्यादा प्रति रूग्ण अडीच लाखांवरून साडे चार लाख रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लाभार्थ्यांची आकडेवारीच उपलब्ध नाही
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव आणि वायसीएम रुग्णालयात अनेक रुग्ण महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभ मिळावा म्हणून अर्ज करत आहेत. अद्याप पर्यंत किती लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला, याची संख्या वैद्यकीय विभागाकडे नाही. एकत्रित आकडेवारी पुण्यातील संबंधीत अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडे संपर्क साधला असता ही आकडेवारी त्वरीत होत नसल्याचे चित्र आहे.
कोट
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि थेरगाव येथील रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. आणखी रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत लाभ मिळावा म्हणून प्रस्ताव पाठविला आहे. यामध्ये महापालिकेचा आकुर्डी, जिजामाता आणि भोसरी रुग्णालयाचा समावेश आहे. एक वर्ष होऊनही अद्याप परवानगी आली नाही.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.