पर्यटनासाठी “भीमाशंकर’च मस्त!

पुणे – घनदाट जंगल, मोठ्या प्रमाणात असलेले वन्यप्राणी, मुलभूत सोयी-सुविधांची उपलब्धता आणि सोबतच भीमाशंकरचे तीर्थस्थान अशा विविध कारणास्तव भीमाशंकर अभयारण्याला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. गेल्या तीन वर्षात पुण्यातील चार अभयारण्यांपैकी भीमाशंकर अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे सात हजारांहून अधिक आहे.

वन्यप्राण्यांना हक्‍काचे निवासस्थान मिळावे, यासाठी 4 ठिकाणी अभयारण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये भीमाशंकर अभयारण्य, मयुरेश्‍वर अभयारण्य, रेहकुरी अभयारण्य आणि माळढोक अभयारण्याचा समावेश आहे. येथे धोकादायक परिस्थितीत असणाऱ्या विविध प्राण्यांसाठी संरक्षित वनक्षेत्र निर्माण करण्यात आले आहे. येथे शेकडो वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. त्यामुळेच ही अभयारण्ये निसर्गप्रेमींसाठी अनोखी अनुभूती ठरते. विशेषत: भीमाशंकर हे अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी निसर्गपर्यटनाची मोठी पर्वणी ठरत आहे.

राज्यप्राणी असलेला शेकरू, हरीण, सांबार, काळवीट यासारख्या वन्यप्राण्यांची रेलचेल, विविध प्रकारच्या वनस्पती, घनदाट निसर्गाने संपन्न असा प्रदेश तसेच याठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध असणारे विविध पर्याय यामुळे भीमाशंकर अभयारण्याला नागरिकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

विशेषत: ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात पर्यटक या अभयारण्याला भेट देतात. यामध्ये निसर्गप्रेमी, अभ्यासक, वन्यजीव फोटोग्राफर आणि विद्यार्थी यांचा समावेश आहे, असे वनविभागागने सांगितले.

मयुरेश्‍वरही “फेव्हरिट’
भीमाशंकर पाठोपाठ सुपे येथील मयुरेश्‍वर अभयारण्यालाही पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. गेल्या तीन वर्षांत मयुरेश्‍वर अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे 6 हजार 907 इतकी होती. तर रेहकुरी काळवीट अभयारण्याला भेट देणाऱ्यांची संख्या 3 हजार 249 इतकी होती. तर, सर्वांत कमी प्रतिसाद हा माळढोक पक्षी अभयारण्याला मिळतो. वन्यप्राण्यांचे कमी प्रमाण असल्याने या अभयारण्याला पर्यटकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वनविभागाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.