मुलांचे शिक्षण पूर्ण केल्यावर आईने दिली 12वीची परीक्षा

46व्या वर्षी 59.8 टक्‍कांनी परीक्षा उत्तीर्ण

वाघापूर – म्हणतात ना मनात जिद्द असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, सचोटी आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणतेही काम अशक्‍य नाही. हीच जिद्द मनात ठेवून राजेवाडी येथील एका महिलने चक्क वयाच्या 46व्या वर्षी 12वीची परीक्षा दिली आणि 59.8 टक्के गुण मिळवून त्या उत्तीर्ण सुद्धा झाल्या. विशेष म्हणजे त्यांनी आधी स्वतःच्या मुलांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर स्वतः 12वीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या.

पुरंदर तालुक्‍यातील राजेवाडी गावच्या शोभा सुनील बधे (होले) या सध्या पुरंदर पंचायत समितीमध्ये परिचर या पदावर कार्यरत आहेत. शोभा बधे यांचे माहेर दौंड तालुक्‍यातील यवत असून 1991 साली त्या पुरंदर तालुक्‍यातील राजेवाडी येथील सुनील बधे यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे शिक्षण 10वीपर्यंत झाले होते. विवाहनंतर त्यांची शिक्षण पूर्ण करण्याची खूप इच्छा होती, परंतु संसाराचा गाडा हाकताना त्यांना इच्छा असूनही वेळच मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात त्यांना दोन मुले झाली. त्यापैकी मुलगी शितल डिप्लोमा पूर्ण करून विवाहबद्ध झाली तर मुलगा अक्षय यानेही शिक्षण पूर्ण करून सध्या तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.

दरम्यान, त्यांनी यावर्षी 12वीची परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त करताच पती सुनील बधे यांच्यासह कुटुंबातील सर्वच सदस्यांनी त्यास पाठींबा दिला. त्यामुळे दहावीनंतर तब्बल 30 वर्षांनी 12वीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी हडपसर येथील क्रांती क्‍लासेसचे विष्णू बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली 17 नंबरचा फॉर्म भरला आणि 2019 फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्या 59.8 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.