Bharat Jodo Nyay Yatra भोपाळ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होणार असून त्यांची ही यात्रा २ मार्चला मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. ती ६ मार्च पर्यंत मध्यप्रदेशात असणार आहे.
मध्यप्रदेशातील यात्रेच्या सर्व काळात कमलनाथ त्यात सहभागी होतील, अशी माहिती पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे. गेले काही दिवस कमलनाथ भाजपमध्ये सहभागी होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर या माहितीला विशेष महत्व दिले जात आहे.
ही यात्रा शेजारच्या राजस्थानातून २ मार्च रोजी मुरैना येथे प्रवेश करेल आणि ६ मार्च रोजी राजस्थानमध्ये पुन्हा प्रवेश करण्यापूर्वी ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, राजगढ, शाजापूर, उज्जैन, धार आणि रतलाम या मार्गावरून जाणार आहे.
दरम्यान, कमलनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या छिंदवाडा येथील अनेक काँग्रेसजनांनी बुधवारी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.