अनेक पशू-पक्षी होरपळल्याची भीती ः आग विझविण्यासाठी हवी सक्षम यंत्रणा
शिंदे वासुली -चाकण परिक्षेत्रातील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी असलेले श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर आज आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. गुरुवारी रात्री डोंगराच्या पुर्वेला मोठी आग लागली. आगीमध्ये डोंगरावरील झाडे झुडपे जळून गेली. त्यामध्ये वन्य पशु-पक्षी आगीमध्ये होरपळून गेले असल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील शिंदे वासुली, भांबोली हद्दी लगत वन जमिनी व त्यामध्येच संपूर्ण भामचंद्र डोंगर आहे. डोंगरावर ठिकठिकाणी दाट झाडी व काळ्या पाषाणाची छटा आहे. या परिसरात माकडे, वानरे, मोर व विविध प्रकारचे पक्षी व अन्य जीव आढळतात. याचबरोबर डोंगरावर वारकरी सांप्रदायाचे अनेक साधक वास्तव्याला असतात.
डोंगरावरील संत तुकारामांना साक्षात्कार झालेले पवित्र तीर्थस्थळ व प्राचीन शिवलिंग असल्याने डोंगरावर मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक दर्शनासाठी येत असतात. डोंगराला वणवा लागल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता जास्त आहे. हा भाग चाकण वनपरिक्षेत्रात येत असल्याने तेथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
आता लागलेली आगीची तीव्रता कमी होती त्यामुळे रात्री उशिरा आग विझवण्यासाठी गेलेल्या आठ नऊ जणांना आग आटोक्यात येऊ शकली. सध्या डोंगरावर गवत, झाडे झुडपे काळवंडलेली आहेत. कधीही मोठ्या प्रमाणात आगीचा डोंब उसळून शकतो. त्यामुळे वनविभागाकडे सक्षम यंत्रणा असायला हवी. असे येथील नागरिकांचे मत आहे.
वणवा लागल्याचे समजताच काही कामगार आग विझवण्यासाठी गेले होते. पुढील काही दिवसांत संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाल्यानंतर वनविभागाकडून वन संरक्षण व देवदर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी एक कामगार ठेवण्याचा विचार आहे.
-एस. डी. जगताप, वनपाल चाकण वनपरिक्षेत्र