हिंजवडी – महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील दिवंगत कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे वारकरी संप्रदायातील योगदानाबद्दल त्यांना मुळशी, मावळ तालुक्यातर्फे श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी भजन, कीर्तन व शोकसभेचे आयोजन केले आहे. याची माहिती मुळशी तालुका वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष बाबाजी शेळके यांनी दिली.
मुळशी व मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित केलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमानिमित्ताने मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील जय सुचंद्रिका मंगल कार्यालयात ज्येष्ठ कीर्तनकार, रामायणाचार्य ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांची सुश्राव्य कीर्तनसेवा गुरुवारी (दि. 7) सायंकाळी 4 ते 6 या वेळेत आयोजित केली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व भाविकांनी तसेच सातारकर यांच्यावर प्रेम करणारे शिष्यगण व अनुयायी यांनी श्रद्धांजली समर्पित कीर्तन सेवेस उपस्थित राहून श्रवण सुखाचा लाभ घ्यावा व सामूहिक श्रद्धांजली सभेस उपस्थित राहवे असे आवाहन शेळके यांनी केले आहे.
गुरुवर्य मारोतीबाबा कुर्हेकर तसेच स्वामी अमृताश्रम महाराज जोशीबाबा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. देहू संस्थान, आळंदी संस्थान, भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट तसेच वेगवेगळ्या दिंड्यांच्या वतीने या संप्रदायिक कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे साधू संत, वारकरी, कीर्तनकार, वादक-गायकवृंद सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.