बस नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांचे हाल, जुन्या गाड्या बनल्या ढकलगाड्या
पाथर्डी : पाथर्डी डेपोच्या बहुसंख्य बस वयोवृद्ध झाल्याने दररोज ठिकठिकाणी बंद पडून प्रवाशासह चालक वाहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गाड्या नादुरुस्त झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून चालक- वाहकांना विनाकारण प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने पाथर्डी डेपोची दयनीय अवस्था झाली आहे.
पाथर्डी -नगर ही बस शनिवारी माळीवाडा बसस्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर बंद पडली. रस्त्यात आडवी बस बंद पडल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. तर पाथर्डी- पुणे पुण्याकडे जाणारी बस सुप्याजवळ बंद पडली. चालक-वाहकांनी प्रवाशांना इतर बसमध्ये बसवून सुप्यातून बस टोचन करून पारनेर डेपोत आणली. या दोन्ही लांब पडल्याच्या गाड्या नादुरुस्त झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.तर चालक वाहकांना विनाकारण प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाथर्डी आगाराच्या बस दररोज कुठे ना कुठे बंद पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. रस्त्यावर बस बंद पडलेली बस व प्रवासी इतर गाड्यांना हात करताहेत हे चित्र नेहमीचे झाले आहे. लांब पल्ल्याच्या बस वेळोवेळी बंद पडू लागल्याने एसटीची प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
पाथर्डी आगाराला एकूण 57 बस आहेत. त्यातील 50 टक्केपेक्षा अधिक गाड्यांची लाईफ संपलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून नवीन बस मिळाल्या नसल्याने स्क्रॅपमध्ये जाणाऱ्या बस रस्त्यावर उतरविल्या आहेत. त्यात दुरुस्तीसाठी स्पेअर पार्ट मिळत नाहीत. प्रवाशांचा रोष येऊ नये म्हणून थातूरमातूर दुरुस्ती करून गाड्या सोडाव्या लागतात. शाळेच्या सहली व लग्न समारंभ अशा प्रासंगिक करारासाठी काही चांगल्या गाड्या पाठविल्या की, वयोवृद्ध गाड्यावर लांब पल्ल्यावर जाण्याची वेळ येते. अशा परिस्थितीमुळे पाथर्डी बस डेपो फक्त कागदावरच चाललेला आहे. प्रत्यक्षात मात्र ठिकठिकाणी बसेस बंद पडलेल्या दिसतात.
काही दिवसांपूर्वी पाथर्डी डेपोला दोन बस नवीन बस मिळाल्या होत्या परंतु तालुक्यातील राजकीय ताकद कमी पडल्याने त्या इतर तालुक्यात गेल्या. वरिष्ठासह स्थानिक अधिकाऱ्यांची उदासीनता, नगर विभागातील अधिकाऱ्यांतील राजकारण , अनुभव नसलेले नवीन अधिकारी , कमी पडणारी राजकीय ताकद , सपोर्ट नसल्याने मनोधैर्य खचलेले कर्मचारी अशा अनेक कारणामुळे पाथर्डी डेपोची दयनीय अवस्था झाली आहे. सध्या सुरू असलेल्या चालढकल कारभारामुळे दिवसेंदिवस पाथर्डी आगाराची आर्थिक गणितासह विश्वासार्हता ढासळत चालली आहे. सद्य परिस्थितीबाबत नवखे आगार प्रमुख वरिष्ठांचे लक्ष वेधण्यास कमी पडत असल्याची भावना प्रवाशासह कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
नवीन गाड्यांसाठी ५ डिसेंबरला रास्तारोको
पाथर्डी आगाराचा गलथान कारभार सुरू असून गाड्या वेळेवर सुटत नाहीत, असा आरोप शहर व्यापारी संघटनेने केला. आगाराला नवीन 30 गाड्या मागून घ्याव्यात वेळापत्रकात सुधारणा करावी ,प्रवाशांना त्रास होणार नाही, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा 5 डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर बाळासाहेब जिरेसाळ , अमोल गर्जे , मधुकर मानूरकर, पांडुरंग शिळवणे,संतोष भागवत, भास्कर कराड, संजय दराडे ,सुनील शहाणे, मोदक शहाणे, सुनील भांगे, बाळासाहेब जोजारे, वैभव चिंतामणी, अशोक नांदेवणीकर, राजेंद्र चिंतामणी, राम भंडारी आदींच्या सह्या आहेत.